मराठी पत्र लेखन शिकण्याचा सर्वात सोपा मार्ग| Marathi formal/Informal letter writing with examples|


             पत्राच्या आधारे सामाजिक व सांस्कृतिक स्थितिगतीचेही दर्शन
होऊ शकते, जनसंपर्काचे ते महत्त्वाचे माध्यम आहे. खाजगी पत्र व्यक्ती-व्यक्तीत
सुसंवाद निर्माण करते. शिफारस पत्र व्यक्तीचे मोल सांगते. तक्रार पत्र, मागणी पत्र
व्यक्तीच्या अपेक्षा, गरजा व्यक्त करते, वाङ्मयीन पत्र मतप्रतिपादन करते. आणि हे
सर्व कमी वेळात व कमी जागेत होते. यासाठीच पत्राचे महत्त्व आहे.

पत्रलेखनाविषयी महत्त्वाची माहिती

             पत्रे अनेक स्वरूपाची असल्याने पत्रप्रकाराप्रमाणे त्याचे
स्वरूप थोडेफार बदलते. कौटुंबिक पत्रात फारशी तंत्रे, पथ्ये पाळली
नाहीत तरी चालते. कारण तेथे आपलेपणा, जिव्हाळा, मोकळेपणा
हाच महत्त्वाचा असतो. भाषा खेळीमेळीची व घरगुती असावी.
पत्रलेखक त्या व्यक्तीशी जणू बोलत आहे, अशा त-हेची वाक्यरचना
असावी. आई-वडिलांना, मोठ्या माणसांना किंवा शिक्षकांना,
वरिष्ठांना पत्र लिहावयाचे असल्यास त्यात नम्रता असावी. घरगुती
पत्रांचा प्रारंभ व शेवट औपचारिक मजकूर व घरगुती चौकशी यांनी
करावा.
           व्यावहारिक व व्यावसायिक पत्रांचे स्वरूप थोडे वेगळे
असते. अशा पत्रांच्या प्रारंभी आपले संपूर्ण नाव व पत्ता लिहावा.
पत्राचा मायना संबंधित व्यक्तीच्या योग्यतेप्रमाणे, पदाप्रमाणे,
अधिकाराप्रमाणे ठेवावा. पत्राच्या विषयाची प्रारंभीचं ठळक अक्षरात
स्वतंत्र नोंद करावी. मांडावयाचा मजकूर मुद्देसुद असावा. अवांतर
अनावश्यक माहिती त्यात नसावी, विषय स्पष्टपणे, स्वतंत्र परिच्छेद
पाडून मांडलेला असावा. पत्राची भाषा व्यावहारिक असली तरी
वाचणाऱ्याला आपल्या पत्राचे महत्त्व वाटावे अशी ती आकर्षक व
दखलपात्र वाटावी. पत्राच्या शेवटी आपले काम, मागणी निश्चितपणे
पण सौम्यपणे लिहिलेली असावी. प्रारंभी भाषा कडक व नंतर सौम्य
अशी असू नये.

(१) कौटुंबिक पत्र

एकत्र कुटुंबात राहणाऱ्या आपल्या भाचीला, मुलीच्या लग्नाचे
निमंत्रण पत्र मामाने कसे पाठवले ते पाहा.

                                                      श्री. नामदेव—–
                                                      ४, आनंदवन, फुलेनगर,
                                                      कॉलेजरोड, अंबेजोगाई,
                                                        १२/१/९८
(ती. आबा व काकूना,)

सा. न. वि. वि.

           आपल्या आशीर्वादाने माझ्या मुलीचे लग्न ठरले असून हा लग्नसोहळा
अंबेजोगाई येथेच १ फेब्रुवारी रोजी ‘शुभमंगल’ कार्यालयात संपन्न होत आहे.
सरोजाला आपणा सर्वांचा सहवास होता. कुंदाच्या सणावाराला, नितीन
भाईच्या दुकानाच्या उद्घाटन सोहळयाला ती आलेली होतीच, तेव्हा आमची
सरोजा तुम्हांला तशी परकी नाहीच. तुम्ही तिचे मुलीप्रमाणे जे लाड करता,
कौतुक करता त्यांनी आम्ही अगदी भारावून जातो. आता तर काय, ती
परक्या घरी जाणार. आपला सहवास कमीच होणार. तेव्हा कोणतेही निमित्त
न सांगता आपण लग्नाला अवश्य यायचेच.
            नितीनभाई व कुंदाला जरा चार दिवस आधी पाठविले तर बरे होईल.
घर जरा लग्नघरासारखे वाटेल. केळवणं, मेंदी, वगैरे कार्यक्रम व्हावयाचे आहेतच,
शिवाय नितीनभाई कामसू असल्याने आम्हांला नेहेमीच हवेसे वाटतात.
           नितू, चिंटूची तर आम्ही रोजच वाट पाहतो. तेव्हा घरातील सर्वांनी या
लग्नाला अवश्य यायचेच. श्री. नितीनभाईंना नमस्कार. काकूंना सा.न.
सरोजा, नित, चिंटूला गोड आशीर्वाद.
             सोबत लग्नाची निमंत्रणपत्रिका पाठवत आहे.

कळावे, असाच लोभ असावा.

                                                                      आपला,
                                                             मामा ऊर्फ श्री. नामदेव—

(१) पत्र लेखकाने उजव्या कोपऱ्यात आपले नाव, पत्ता व तारीख
लिहिलेली आहे
(२) पत्राचा मायना भाचीच्या सासू-सासऱ्यांना उद्देशून
असल्यामुळे आदरार्थी सा. न. वि. वि, असा लिहिला आहे.
(३) भाची एकत्र कुटुंबात राहत असल्याने पत्र तिच्या नावे न
लिहिता सासू-सासऱ्यांच्या नावे लिहिलेले आहे.
(४) पत्राची भाषा आपलेपणाची व आग्रहाची आहे.
(५) पत्र नेमके कशाविषयी याची प्रारंभीच नोंद केल्यामुळे उगीचच
ताण जाणवत नाही.
(६) विषयानुरूप पत्राचे तीन भाग – स्वतंत्र परिच्छेदांत लिहिले
आहेत. प्रारंभी वडीलधारी माणसे, भाची, जावई व नंतर
मुले असा वयानुरूप क्रम ठेवला आहे. यातून आदर व्यक्त
होतो.
(७) सोबत स्वतंत्र निमंत्रणपत्रिका पाठवत असल्याचा निर्देश केला
आहे.
(८) पत्राचा शेवट, ‘कळावे, असाच लोभ असावा’ या शब्दांनी .
केला आहे.
आता तुमच्या लक्षात आले असेलच की, पत्र दोन व्यक्तीना-
जोडण्यास कसे उपयुक्त ठरते. नुसती निमंत्रणपत्रिका आग्रह सांगत –
नाही. सोबतच्या प्रेमळ पत्राने सदभाव वाढीस लागेल.

(२) व्यावसायिक / व्यावहारिक / कार्यालयीन पत्र.

              मराठी अभ्यास परिषद

                                                                    मृणालिनी —
                                                                    कार्यवाह
                                                                    मराठी अभ्यास परिषद
                                                                    २, शीतल अपार्टमेंट,
                                                                    ४१/४, एरंडवन,
                                                                    पुणे ४११००८
                                                                    दूरध्वनी ३३३८_ _
                                                                    १/१२/९७

                प्रति,
                डॉ. व. गो. कुलकर्णी,
                सप्रेम नमस्कार विनंती विशेष

              मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या मराठी अभ्यास परिषद
पत्रिका : ‘भाषा आणि जीवन’ चे आ.पण आजीव वर्गणीदार आहात. ‘भाषा आणि
जीवन’सारखे वैचारिक नियतकालिक गेली १४ वर्षे आम्ही शिकस्तीने चालवत आहोत
ते केवळ आपणा सर्वांच्या सहकार्यामुळेच! महाराष्ट्र फाउंडेशनचा १९९५चा वैचारिक
नियतकालिकाचा पुरस्कार ‘भाषा आणि जीवन’ला मिळाल्यामुळे आमची उमेद वाढली.
पण तरीही आर्थिक चणचण फारशी कमी झाली असे नाही. म्हणूनच आम्ही आज
आपल्याशी संपर्क साधत आहोत.
               मराठी अभ्यास परिषद पत्रिकेच्या १९९१ ते १९९७पर्यंत झालेल्या आजीव
वर्गणीदारांना आज एक खास सवलत देत आहोत. ती अशी की, या कालावधीतील
वर्गणीदारांना म. अ. परिषदेचे आजीव सभासद होता येईल. आपण यापूर्वी पत्रिकेची
आजीव वर्गणी रु. ४०० दिलेली आहे. आपल्याला संस्थेचे आजीव सभासद व्हावयाचे
असल्यास सोबत पाठवलेल्या आवेदनपत्राबरोबर रु.२००/- भरणे आवश्यक आहे. आपण
पत्रिकेप्रमाणेच संस्थेचेही आजीव सभासद झालाततर आपल्याला संस्थेच्या आजीव सभासदांचे
हक्क मिळतील (उदा. मतदानाचा हक). आपल्याला संस्थेचे आजीव सभासदत्व घेण्याची इच्छा
नसल्यास सोबतचे आवेदन पत्र भरून देण्याची काहीच आवश्यकता नाही. आपल्याला
नेहमीप्रमाणेच भाषा आणि जीवन’ मिळत राहील.
               पत्रिका आपलीच आहे. ती उत्तम स्थितीत चालू राहण्यासाठी आपल्यासारख्या सुहृदांच्या
सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. आर्थिक अडचणीमुळे व वाढत्या महागाईमुळे आजकाल
मराठीमधील वैचारिक स्वरूपाची नियतकालिके बंद पडत आहेत. अशा वेळी आपणच आम्हांला मदत
करावी, असे नैतिक आवाहन आम्ही करीत आहोत. १९९७ साली पत्रिकेची आजीव वर्गणी रु. ६००/-
करण्यात आली होती. आपण रु. २००/- वा त्याहून अधिक वर्गणीरूप देणगी पाठवून आमची उमेद
वाढवावी. आपण आमच्या या आवाहनास प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगत आहोत.

कळावे.
                                                                            आपली,
                                                                           मृणालिनी —-
                                                              कार्यवाह- मराठी अभ्यास परिषद
                                                                           १/१२/९७

हे व्यावहारिक पत्र वाचल्यावर खालील गोष्टी लक्षात घ्या

(१) कागदाच्या मध्यभागी संस्थेचे नाव आहे.
(२) उजव्या कोपऱ्यात संस्थेचे कार्यवाह – त्यांचे नाव, पत्ता,
तारीख आहे.
(३) ज्याला पत्र लिहावयाचे त्याचे नाव व मायना – सप्रेम नमस्कार
विनंती विशेष असा आहे.
(४) वर्गणीरूप देणगीचे आवाहन हा मुख्य विषय. पण विषय
नाजूक असल्याने प्रथमच न नोंदवता पहिल्या परिच्छेदाच्या
शेवटी हळूवार भाषेत आवाहनात्मक पद्धतीने नोंदवला आहे.
(५) मध्यभागी मुख्य काम व त्याचे स्वरूप – फायदे, इत्यादी
(६) शेवटी पुनश्च नैतिक आवाहन – स्पष्ट व आशावादी दृष्टीने
केलेले.
(७) पत्रासोबत आवेदनपत्र पाठविल्याची आठवण केली आहे.
(८) पत्राचा शेवट कळावे’ शब्दाने करून आपली’ असे लिहिले
आहे. लेखकाचे कार्यालयीन पद व तारीख आहे.
आता तुमच्या लक्षात आले असेल की, अशा व्यावहारिक
पत्राला आपलेपणाने सभासद प्रतिसाद देतील. वस्तुस्थिती कथन,
स्पष्टता व वैचारिक आवाहन-असा मोजकाच मजकूर असूनही पत्र
नवे आजीव सभासद मिळवू शकेल असे आहे.

(३) तक्रार पत्र

                                                                    श्री. अरुण —–
                                                                    दुसरी चाळ, गावभाग,
                                                                    देवी चौक, नाशिकरोड
                                                                    २०/२/९७

          माननीय आरोग्य अधिकारी,
          नाशिक महानगरपालिका,
          नाशिक, यांसी

स.न.वि.वि.

विषय – सांडपाण्याच्या अव्यवस्थेसंबंधी तक्रार,

             मी, श्री. अरुण —- ज्या गावभागात राहतो तेथे सांडपाण्याची योग्य व्यवस्था
लावण्यात आलेली नाही. सर्वत्र उघडी गटारे, वाट्टेल तिकडून वाहणारे पाणी, त्यावर बसणारे
डास, कीटक व त्यांमुळे फैलावणारे रोग यांनी आम्ही गेले दोन वर्षापासून कंटाळून गेलो आहोत.
पाच वर्षांपासून मी या भागात राहत आहे. दोन निवडणुकांच्या वेळी उभे असलेले उमेदवार येऊन
गेले. आम्ही आमची तक्रार नोंदवली. पण अद्याप कोणीच दखल घेतलेली नाही.
             मी अशाच आशयाचे एक पत्र आपणाकडे २०/१२/९६ला पाठवले होते. परंतु अद्याप
दखल नाही. आपण साधे चौकशीलाही कोणी आला नाहीत. आता तरी या पत्राची दखल घ्याल,
अशी अपेक्षा आहे.पत्र जरा रागानेच लिहिले गेले. पण खूप सोसलेल्या त्रासापोटी असे झाले हे
आपण समजून घ्यावे.

                           कळावे.
                                                                              आपला,
                                                                             अरुण ——

(१) पत्र लेखकाचे नाव व पत्ता उजव्या कोपऱ्यात,
(२) डाव्या कोपऱ्याला ज्याला पत्र लिहावयाचे त्याचे पद व पत्ता,
(३) मायना स.न.वि.वि, असा,
(४) तक्रारीचे स्वरूप व निवेदन पोटतिडिकीने,
(५) दुसरे पत्र असल्याची नोंद,
(६) शेवटी दिलगिरी व्यक्त करून उजवीकडे सही आहे.

या नमुना पत्रावरून पत्र लेखनाची तंत्रे आपल्याला समजली
असतील, या प्रत्येक पत्रप्रकारानुरूप लक्षात ठेवावयाचे मुद्दे थोडे
वेगळे आहेत ते लक्षात घ्या. पत्राने संवादच साधायचा आहे. विसंवाद
नाही हे लक्षात असू द्या.About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "मराठी पत्र लेखन शिकण्याचा सर्वात सोपा मार्ग| Marathi formal/Informal letter writing with examples|"

आपले मत कळवा