तुमचे जीवशास्त्रीय वय कसे माहीत कराल ? biological age vs Actual age

शैक्षणिक
फोटो- गुगल मामा


जीवशास्त्रीय वय

प्रत्येकाला दोन वये असतात. आपण ज्याला वय
म्हणतो, म्हणजे शाळा, कॉलेजात लावतो, नोकरीसाठी सांगतो,
ज्याच्याप्रमाणे वाढदिवस साजरे करतो आणि जन्मलेल्या
दिवसापासून जे काळाबरोबर सतत वाढत जाते, त्या
कालक्रमिक (Chronological) वयाशी आपण सर्वजण
चांगले परिचित आहोत. पण याशिवाय माणसाचे दुसरेही एक
शारीरिक स्थितीशी संबंधित आणि शरीरक्रियांवर आधारित,
जीवशास्त्रीय वय असते हे फार थोड्यांना माहीत आहे.

कालक्रमिक वयाची गती व क्रम नियमित असतो पण
माणसाचे जीवशास्त्रीय वय, त्याच्या शारीरिक कार्यक्षमतेवर
अवलंबून असल्याने कालक्रमिक वयाच्या मानाने कमी-अधिक
भरते. आपण एखाद्याची शारीरिक क्षमता पाहून पुष्कळदा म्हणतो की
“किती कमी वयात म्हातारा झाला हो!” अथवा “हा तर
साठीचा तरुण !” असे उद्गार काढतो आणि अप्रत्यक्षपणे त्या
व्यक्तीच्या जीवशास्त्रीय वयासंबंधीची आपली प्रतिक्रिया व्यक्त
करतो.

हा माणसाच्या जीवशास्त्रीय वयाचा ठोकळ अंदाज
आहे. परंतु माणसाची साधारण शारीरिक कार्यक्षमता हेच
त्याचे जीवशास्त्रीय वय असते. जीवशास्त्रीय वय अचूक
कळण्यासाठी प्रथम माणसाच्या कालक्रमिक वयाच्या
वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याच्या शारीरिक कार्यक्षमतेचे शास्त्रीय
दृष्टिकोनातून काटेकोर मोजमाप करावे लागते. हा
माणसाच्या एकंदर स्वास्थ्य, आरोग्य आणि शारीरिक स्थितीचा
अंदाज असतो म्हणून याचे महत्त्व आहे.

शरीरात अनेक उपयुक्त क्रिया होत असतात म्हणून
साऱ्या शरीराची कार्यक्षमता, केवळ त्याच्या विविध क्रियांची
क्षमता मोजूनच काढता येऊ शकते, यासाठी
शास्त्रज्ञांनी मानवी शरीरातील शरीरक्रिया क्रिया आठ वेगवेगळ्या
गटांत विभागल्या आहेत.

(१) रक्ताभिसरण
(२) श्वासोच्छ्वास
(३) अन्नपचन
(४) उत्सर्जन
(५) मज्जा कार्य
(६) अंत:स्त्राव व प्रजनन
(७) स्नायूंचे कार्य
(८) अस्थींचे कार्य

शरीराची जशी वाढ होत जाते तशी जीव शक्तीही
अधिक होते, पण पूर्ण वाढीनंतर जसे माणसाचे वय अधिक
होऊ लागते तशी ही शक्ती घटत जाते. शरीराच्या पूर्ण वाढीनंतर
जितके अधिक कालक्रमिक वय तितकी जीवशक्ती कमी हा
सर्वसाधारण नियम आहे. शरीरवाढीचा आणि वाढत्या वयाचा परिणाम
शरीरक्रियांच्या आठही गटांवर होतो व प्रयोगशाळेत हे परिणाम
मोजून, शरीराच्या कार्यक्षमतेचा अंदाज घेता येतो.

रक्ताभिसरण क्रियेत हृदयाची क्षमता आणि रक्तदाब हे
मुख्य मूल्यमापक आहेत. फुफ्फुसाचे काम श्वासावाटे आत
घेतलेल्या हवेतून प्राणवायू शोषणे आणि शरीरातला कर्बन वायू
बाहेर टाकणे हे असल्याने, श्वासोच्छ्वास हेच मुख्य मूल्यमापन
आहे

अन्नपचन आणि उत्सर्जन संस्थांचे कार्य यकृत
आणि मूत्रपिंड या इंद्रियांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते.
मज्जासंस्थेचे कार्य प्रत्यक्ष व्यक्तीची वागणूक, निरीक्षण व
परावर्तित क्रिया (Reflexes) व ज्ञानेंद्रियांची क्षमता मोजून
ठरवता येते.
स्नायूंची शक्ती मोजता येऊ शकते. अस्थिची
स्थिती पाहून ओळखता येते. शरीरक्रिया आणि
इंद्रियांच्या कार्यक्षमतेचे आकडे वेगवेगळ्या वयांत, साधारण
१० वर्षांच्या टप्प्याने गोळा केले म्हणजे वाढत्या
वयोमानाबरोबर माणसाच्या एकंदर कार्यक्षमतेत होणाऱ्या
बदलांचे आपोआप मूल्यमापन होते आणि जीवशास्त्रीय
वयाचा एक ‘स्टॅण्डर्ड’ समजतो.

शारीरिक कार्यक्षमता अथवा जीवशास्त्रीय वयाच्या
रेषेचा, कालक्रमिक (ढोबळ मानानेआपण मानतो ते वय) वयाच्या
मानाने दिसणारा कल प्रत्यक्ष व्यवहारातही अनुभवता येतो.

साधारण २० /२२ वर्षांच्या वयापर्यंत माणसाची
जीवशक्ती झपाट्याने वाढते. २०/२२ वयात तारुण्याचा जोम,
कार्यक्षमता आणि शारीरिक आरोग्याची स्थिती, आयुष्यात
उच्चतम असते. ३० वर्षांपर्यंत ही स्थिर राहते व नंतर हळूहळू
कमी होऊ लागते. या उतरत्या काळात दररोज एक लक्ष
शरीरपेशी नष्ट होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
वृद्धावस्थाही याच काळात सुरू होते.


आयुष्याच्या ७०-८० वर्षे वयात जीवशास्त्रीय रेषा एकदम
खाली येते. शरीराची कार्यक्षमता व अनेक शरीरक्रिया घटत
निम्म्या होतात. मृत्यू ओढविण्याचे प्रमाणही याच काळात
एकाएकी अधिक होते.
जीवशास्त्रीय वयाची साधारण रेषा काढणे फार
गुंतागुंतीचे काम आहे. एक दोन स्वयं-सेवकांवर प्रयोग करून
भागत नाही. वेगवेगळ्या वयाच्या शेकडो निरोगी व्यक्तींचे
निरीक्षण करून, १०/१० वर्षे वयाच्या अंतरावर, सरासरी
आकड्यांची कोष्टके तयार करावी लागतात. पुन्हा शरीरक्रिया
संस्थांची कार्यक्षमता लिंग आणि जातिभेदानुसार थोडीफार
बदलत असल्याने, स्त्रिया आणि वेगवेगळ्या वंशाच्या
लोकांसाठी वेगळी कोष्टके जुळवून तयार करावी लागतात.


अमेरिकेतील बोल्टन येथल्या वृद्धत्वासंबंधी संशोधन
करणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अजिंग या संस्थेने माणसाचे
जीवशास्त्रीय वय काढण्याचे, शारीरिक कार्यक्षमतेच्या मानक
रेषांवर आधरित, तंत्र आधीच पूर्ण केले आहे. यासाठी त्यांनी
शरीराच्या २४ प्रमुख क्रियांची निवड केली आहे. शारीरिक
कार्यक्षमतेच्या सरासरीची कोष्टके आणि मानक रेषा तयार
असल्या म्हणजे त्यावरून कोणत्याही व्यक्तीची शारीरिक
क्षमता, तिच्या कालक्रमिक वयाच्या तुलनेने किती खाली किंवा
.वर आहे, म्हणजेच त्या व्यक्तीचे जीवशास्त्रीय वय किती आहे
ते तात्काळ सांगता येते.
.
.
.
.

एक उदाहरण बघूया….

एका ८० वर्षे वयाच्या व्यक्तीचे प्रयोगशाळेत
परीक्षण केल्यानंतर हृदयाची रक्त फेकण्याची क्षमता, जी
साधारणत: या वयात २.५ लिटर प्रतिमिनिट असते ती ३.६
आहे आणि मूत्रपिंडात यूरिया गाळण्याची क्षमता जी ४८
मिलिम प्रतिमिनिट असते त्याऐवजी ती ६५ मिलिग्रॅम आहे
असे आढळते.
आता कोष्टकात अथवा मानक रेषेवर हे आकडे ६०
वर्षे कालक्रमिक(ढोबळ मानानेआपण मानतो ते वय) वयाशी मिळते जुळते आहेत,
म्हणून परीक्षण केलेल्या व्यक्तीचे कालक्रमिक वय ८० असले तरी तिचे
जीवशास्त्रीय वय ६० ठरते. तर काही वेळेला उलट परिस्थितीही
उद्भवू शकते आणि मग ४० वर्षे वयातच ६० वर्षे जीवशास्त्रीय
वयाची लक्षणे दिसत असतात. अशा परिस्थितीमध्ये ती
व्यक्ती जरी ४० कालक्रमिक वर्षांची असली तरी ती ६० वर्षे
जीवशास्त्रीय वयाचीच ठरते.

जीवशास्त्रीय वयावरून व्यक्तीच्या शरीरस्वास्थ्याची
चांगली कल्पना येते, म्हणून आयुष्याच्या कोणत्याही एका
टप्प्यांवर तो पुढे अजून किती वर्षे जिवंत राहणार, या सरासरी
अपेक्षेऐवजी (Average Age expectamey) त्याचे
जीवशास्त्रीय वय काढून, त्याची शरीरस्वास्थ्य आणि
कार्यतत्परता पुढे टिकून राहण्याची सरासरी (Average Age
exectamey) ठरविणे अधिक महत्त्वाचे आणि उपयोगाचे.
वृद्धावस्थेमध्ये रक्तवाहिन्या कठीण होतात म्हणून
रक्ताचा दाब वाढतो आणि हृदयाला अधिक श्रम झाल्याने ते
थकते पण अनेकदा, “माणसाच्या रक्तवाहिन्या जितक्या
वृद्ध तितका तो माणूस म्हातारा” असे म्हटले जाते. सध्या
उपलब्ध असणान्या माहितीवरून हे विधान काही खोटे म्हणता
येणार नाही. तसेच पुष्कळदा वापरल्या जाणाऱ्या “साठ वर्षांचा
तरुण” आणि “ऐन पंचविशीतच म्हातारा” यासारख्या
वाक्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून काय अर्थ काढावा याचाही
उलगडा होऊ शकतो.


लेख पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद🙏

संदर्भ- ycmou अभ्यासक्रम

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "तुमचे जीवशास्त्रीय वय कसे माहीत कराल ? biological age vs Actual age"

आपले मत कळवा